धारेश्वर धबधब्यातील कुंडात पडून जळगावातील तरूणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोयगाव तालुक्यातील धारेश्वरच्या पर्यटन स्थळावरील धबधब्याच्या ठिकाणच्या कुंडात तोल जाऊन पडलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून मृत गौरव किसन नेरकरयाचा मृतदेह सोमवारी सकाळी कुंडाच्या कपारीत आढळून आला. मृत गौरव हा जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मृत गौरव याच्या पार्थिवावर जळगाव येथील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगाव येथील १६ जणांच्या समूहासोबतच गौरव धारेश्वरच्या पर्यटन स्थळी आला होता. रविवारी सायंकाळी सहा वाजता धबधब्याजवळ भ्रमंती करत असताना गौरवचा अचानक तोल जाऊन पाय घसरला व तो धबधब्यात जाऊन पडला होता. एक तास होऊनही तो परतला नसल्याने त्याचे मित्रांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री आठ वाजता बनोटी पोलीस दुरक्षेत्र गाठून गौरव हरविल्याची तक्रार दिली होती. त्यावरून सोयगाव पोलिसांनी संशयावरून गौरवचा धबधब्यात शोध सुरू केला होता. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी ग्रामस्थ व पोलीस पाटील सुनील जाधव यांच्या मदतीने शोध मोहीम राबविली होती.

पुन्हा सोमवारी सकाळी सात वाजता सोयगावचे उपनिरीक्षक रजाक शेख, विकास दुबिले, संदीप सुसर, सतीश बर्डे, राजू बर्डे,यांनी पट्टीचे पोहणारे रामदास जाधव यांच्या मदतीने, पोलीस पाटील सुनील जाधव, श्रीरंग जंजाळ, बंडू पाटील, सोन्या गवळी आदींनी शोध मोहीम हाती घेतली. अखेर अकरा वाजता रामदास जाधव यांना धबधब्याच्या खोल कपारीत मृत गौरव नेरकरचा मृतदेह आढळून आला. बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. कादरी सपुरा यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Protected Content