गिरणा नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातून घरी जाण्यासाठी निघालेल्या तरूणाचा गिरणा नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहामध्ये सापडून बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. दुसऱ्या दिवशी गुरूवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता तरूणाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जितेंद्र शांताराम बाविस्कर वय ३१ रा. कानळदा ता. जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथे जितेंद्र बाविस्कर हा तरूण आपल्या आईवडील आणि भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. शेती करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जितेंद्र हे शेतातील काम आटोपून घरी जाण्यासाठी गिरणा नदी पात्रातून जाण्यासाठी निघाला. त्यावेळी गिरणा नदीच्या पात्रातून जात असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामध्ये जितेंद्र हा सापडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा रात्री उशीरापर्यंत शोधाशोध केली. परंतू माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता जितेंद्र बाविस्करचा मृतदेह गिरणी नदीच्या पात्रात तरंगतांना आढळून आला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड अक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे हे करीत आहे.

Protected Content