नंदूरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नंदूरबार जिल्हयातील तोरणमाळच्या सिताखाई पॉइंटवर दाट धुळे असताना एक युवक छायाचित्र घेत असता त्याचा पाय घसरल्याने तो खोल दरीत कोसळला. त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मदतीने मंगळवारी त्याचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथील भारत पावरा हा त्याच्या मित्र व नातेवाईकांबरोबर धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे पर्यटक म्हणून गेला होता.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ढगाळ वातावरण व धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे सिताखाई पॉइंटवर धोक्याच्या ठिकाणी छायाचित्र काढण्याचा मोह भारतला झाला. छायाचित्रासाठी तो दरीच्या ठिकाणी असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. या घटनेनंतर त्याचा दरीत शोध घेण्यात आला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर अधीक्षक नीलेश तांबे, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, हवालदार काशिनाथ साळवे, रणसिंग सनेर, पोलीस नाईक दादाभाई साबळे, शैलेश राजपूत, अजित गावित, मोहन साळवे, पोलीस शिपाई वसंत वसावे, राकेश पावरा, प्रल्हाद राठोड यांच्यासह रोमा गावातील ग्रामस्थ जीवन चौधरी आणि इतरांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पावसामुळे व दाट धुक्यामुळे दरीतून मृतदेह काढतांना पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागले. म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली. शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. म्हसावद पोलीस ठाण्यात दरबार पावरा यांच्या माहितीवरुन नोंद करण्यात आली.