
सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. न्हावी गावाजवळील चावदस नगर टोल नाक्याजवळ ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रविवारी ७ सप्टेंबर दुपारी साडेतीन वाजता घडली. मृत तरुणाचे नाव आदित्य तुळशीराम काठोके (रा. कासारगल्ली, फैजपूर) असे आहे. या घटनेची माहिती मृताचे काका विलास बळीराम काठोके (वय ४७) यांनी पोलिसांना दिली.

अचानक चक्कर आल्याने घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य आपल्या मित्रासोबत न्हावी येथून ट्रॅक्टरवरून परत येत होता. त्यावेळी त्याने अचानक वाहन थांबवण्यास सांगितले आणि ‘मला चक्कर येत आहे’ असे म्हणाला. त्यानंतर अचानक त्याचा तोल जाऊन तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी डॉ. खाचणे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू
या दुर्दैवी घटनेची नोंद फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार देवीदास विष्णू सुरदास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अचानक झालेल्या घटनेमुळे काठोके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आदित्यच्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.



