पुण्यात अंगावर झाड कोसळल्याने तरूणाचा मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला असून काही भागात अवघ्या दोन तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे काही भागात पूरसदृश परिस्थितीही निर्माण झाली होती. दरम्यान, पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात अंगावर झाड कोसळल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.योगेश वांढरे असे अंगावर झाड कोसळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना फोन आला की, वंधारे झाड कोसळून जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अग्निशमन दलाच्या पथकाने काही तासात ढिगारा हटवला.

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचणे, झाडे पडणे, वीज पुरवठा खंडित होणे आणि वाहतूक कोंडी च्या घटना घडल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत अग्निशमन दलाकडे घरात पाणी शिरल्याच्या ५५ तक्रारी आणि भिंत कोसळल्याच्या २२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकतेच पावसाचे आगमन झाले असताना नागरिकांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावा लागले. पुण्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला गुडघाभर पाण्यात कारमध्ये अडकल्याचे दिसत आहे. तेव्हा दोन पोलीस तिथे येतात आणि त्या महिलेला बाहेर काढतात. ही घटना विमाननगर परिसरातील आहे. हा व्हिडिओ ९ जून रोजी शेअर करण्यात आला. पोस्ट केल्यापासून त्याला ४६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. या पोस्टला जवळपास ३०० लाईक्स देखील आहेत आणि ही संख्या वाढतच चालली आहे. या शेअरवर असंख्य कमेंट्सही आल्या आहेत.

Protected Content