जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्जबाजारीपणा आणि यंदाच्या दुबार पेरणीच्या संकटामुळे त्रस्त झालेल्या डोमगाव येथील एका तरूण शेतकऱ्याने रेल्वेखाली येऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी ७ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास म्हसावद रेल्वेगेटजवळ घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी कुटुंबांवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
किशोर आसाराम धनगर (वय ३८, रा. डोमगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर धनगर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही वर्षांपासून ते कर्जामुळे त्रस्त होते. त्यातच, यावर्षी लवकर पेरणी केली असताना पाऊस न झाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. याच चिंतेने ते ग्रासले होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

सोमवारी ७ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास, म्हसावद रेल्वे गेटजवळ किशोर यांनी पुष्पक एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले. किशोर धनगर सकाळी घरून जेवण करून शेतात गेले होते. शेतात काही वेळ काम केल्यानंतर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या गावातील एका ग्रामस्थाच्या ही घटना लक्षात येताच, त्यांनी तात्काळ गावातील इतरांना कळवले. माहिती मिळताच, एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
त्यांच्या पश्चात आई सुनंदाबाई धनगर, पत्नी उज्ज्वला धनगर, ७ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची एक मुलगी असा परिवार आहे. किशोर यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.



