धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील गोंदेगाव ते रोटवद दरम्यानच्या रस्त्याच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा बळी गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवकाबाई शिवाजी मराठे (वय ५५, राहणार रोटवद ता.धरणगाव) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी शिवाजी मराठे आपल्या आई देवकाबाई मराठे यांच्यासोबत गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी नातेवाईकांकडे चिंचपुरा गावाला गेले होते. काम आटोपून घरी परतत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाला. या अपघातात देवकाबाई मराठे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, रस्ता कॉन्ट्रॅक्टरने रस्त्यावर काम सुरू करत असताना कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावले नव्हते, त्यामुळे हा अपघात झाला आहे, असा आरोप रोटवद गावातील गावकऱ्यांनी केला आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे पाईप टाकलेले असताना त्यावर केवळ माती टाकली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जात असताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने अपघात होत आहे, असा देखील त्यांनी आरोप केला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.