पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा बस प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. पारोळा बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना २३ जानेवारी रोजी दुपारी घडली.

फिर्यादी मनिषाबाई प्रविण पाटील (रा. टिटवी, ता. पारोळा) या दुपारी १:३० वाजेच्या सुमारास बस स्थानकावर उभ्या होत्या. जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने मनिषाबाई यांच्या डाव्या हातातील १७ ग्रॅम ५९० मिली वजनाची सोन्याची बांगडी शिताफीने चोरून नेली. बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने त्यांना आपल्या हातातील बांगडी गायब असल्याचे लक्षात आले. या सोन्याच्या बांगडीची किंमत सुमारे ५१ हजार रुपये आहे. त्यांनी तातडीने पारोळा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.




