जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात जामनेर येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील ९१ हजार रूपये किंमतीची सोन्याची माळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियंका कैलास पाटील वय ४० रा. आयटीआय कॉलनी, जामनेर ही महिला कामाच्या निमित्ताने मंगळवारी ६ जानेवारी रोजी जळगाव शहरात आलेल्या होत्या. सायंकाळी त्या नवीन बसस्थानक येथे बसची वाट बघत होत्या. सायंकाळी ५ वाजता नवीन बसस्थानकात जामनेर बस क्रमांक (एमएच १४ बीटी १९५२) ही बस लागल्याने त्या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९१ हजार रूपये किंमतीची सोन्याची माळ चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी सर्वत्र सोन्याची पोत शोधली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सतिष सानप हे करीत आहे.




