काचेची बाटली मारून महिलेला केले जखमी

धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील दर्ग्याजवळ एका महिलेने दुसरा प्रेमविवाह केल्याचा कारणावरून एकाने शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत हातावर काचेची बाटली फोडून गंभीर जखमी केल्याची घटना १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी २० जून रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेने दुसरा प्रेम विवाह केला. या रागातून १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता महिलाही धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील दर्गा समोर पायी जात असताना गोपाल भगवान पाटील रा. भडगाव याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच त्याच्या हातातील काचेची बाटली फोडून तिच्या पाठीवर व डाव्या हातावर वार करून जखमी केले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महिलेला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी २० जून रोजी दुपारी ३ वाजता महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी गोपाल भगवान पाटील रा. भडगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन कुवारे करीत आहे.

Protected Content