पुण्यात भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील रहदारीचा परिसर असलेला मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात एका भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिची सून ही गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात दुपारी १२ च्या सुमारास घडला. या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहे. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असूनही बांधकाम व्यावसायिकांचे ट्रक, मिक्सर येथून ये जा करीत असतात. त्यांच्या बेदरकारपणामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

अशोक छोटेलाल महतो असे डंपर चालकाचे नाव असून त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मयंती भूपेंद्र सोळंकी (रा. गंगाधाम, कोंढवा रोड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या अपघातात त्यांची सून प्रियांका सोळंकी या गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात झाला तेव्हा प्रियांका मोटारसायकल चालवत होती तर आणि सासू मागे बसली होती. दोघेही मार्केट यार्डच्या दिशेने जात असताना गंगाधाम चौकातील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मार्केट यार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांनी सांगितले की, महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आम्ही तिच्या सुनेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, स्थानिकांनी डंपर चालकाला मारहाण केली आणि अवजड वाहनावर दगडफेक केली, खिडक्या आणि विंडशील्डचे नुकसान केले. तसेच आरोपी ट्रक चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी ट्रकचालक महतो याच्यावर भादंविकलम ३०४ आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या अपघात प्रकरणी स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे. हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद असतांना येथून वाहतूक ही कशी करू दिली जाते असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला आहे. वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर राजकारणी आणि लोकप्रतिनिधींकडून पोलिसांवर दबाव टाकला जातो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दमयंतीबेन भूपेंद्र सोलंकी यांचा बळी प्रशासनाच्या चुकी मुळे गेला. त्यामुळे प्रशासनाला जाग यावी म्हणून पुणे नागरी मांचातर्फे आज सकाळी ८.३० वाजता गंगाधाम चौकात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रशासनाचा आणि पोलिसांचा निषेध नागरिक करणार आहेत.

Protected Content