जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव विवेकानंद कॉलनीतील एका महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकल्याचे सांगून या प्रकरणी३ वर्षाची शिक्षा होणार असल्याची धमकी देत, नकली सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महिलेला ८ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार बुधवार १२ जून रोजी उघडकीला आले आहे. या प्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता जळगाव सायबर पोलीसात सीबीआयचे अधिकारी सांगत असलेल्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील विवेकानंद कॉलनी भागात वास्तव्यास एक ४२ वर्षीय महिलेला खासगी ठिकाणी नोकरी करते. यांना ११ जून रोजी व्हॉटसॲप वरुन फोन आला. त्यातील एका व्यक्तीने त्याचे नाव अनिल यादव सांगत, तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच संबधित महिला एका गुन्ह्यात अडकली असल्याचे सांगितले. सुरुवातीला महिलेने या कॉलकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर पुन्हा सुनील कुमार नामक व्यक्तीचा फोन आला, तसेच संबधित व्यक्तीने देखील आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र महिला घाबरली, काही वेळानंतर हे फोन येतच राहिले. तसेच ज्या गुन्ह्यात ती महिला अडकली असल्याचे तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात महिलेला ३ वर्षाची शिक्षा होणार असल्याचीही धमकी संबधितांनी महिलेला दिली. तसेच या शिक्षेपासून वाचायचे असल्यास ऑनलाईन पध्दतीने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली. यानंतर घाबरलेल्या महिलेने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम नकली सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबधित महिलेने त्या दोघांना फोन केला. मात्र, दोघांचे फोन नंबर बंद आले. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, संबधित महिलेने सायबर पोलिस ठाण्यात सीबीआयचे आधिकारी सांगणाऱ्या दोन्ही अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला.