पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरात भरधाव मोटारीने वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी मोटारचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मोटारचालक संतोष शिवाजी गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोटारचालक गायकवाड हे शिक्षक आहेत. बुधवारी दुपारी ते मोटारीतून नांदेड सिटी परिसरातील डीसी मॉलजवळून निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटले.
मोटारीने दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. त्यानंतर मोटारीने दोन ते तीन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी मोटारचालक गायकवाड यांना चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारचालक गायकवाड यांना ताब्यात घेतले. अपघातात जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोटारचालक गायकवाडची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली.