Home Cities जळगाव विकसनशील भारताला विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प : पालकमंत्री

विकसनशील भारताला विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प : पालकमंत्री


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसनशील भारताला विकसित भारताच्या दिशेने नेणारा दिशादर्शक, संतुलित आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प असल्याचे मत जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. पायाभूत सुविधा, शेती, उद्योग आणि महिला सक्षमीकरण या महत्त्वाच्या क्षेत्रांवर ठोस भर देण्यात आल्याने देशाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

या अर्थसंकल्पातून नियोजनबद्ध शहरीकरण, उद्योग व उद्योजकतेला चालना आणि गुंतवणूक तसेच रोजगार निर्मितीसाठी दीर्घकालीन व भक्कम उपाययोजना स्पष्टपणे दिसून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय हा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, रस्ते, रेल्वे, दळणवळण, औद्योगिक वसाहती आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदी या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी, पशुपालक आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांना या योजनांचा थेट लाभ मिळून ग्रामीण भागातील आर्थिक चक्र अधिक मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरल्याचे नमूद करताना ‘लखपती दिदी’ योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स, उद्योग व व्यवसाय संधी निर्माण करण्याची घोषणा ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा देणारी असल्याचे पाटील म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा मोठा टप्पा ठरेल, असे त्यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मिती हे प्रमुख ध्येय ठेवून गुंतवणुकीला चालना देणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठीही लाभदायक ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी काळात राज्यात नव्या गुंतवणुका, उद्योग आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकूणच, गुंतवणूक, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा या सर्व घटकांचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करणारा ठरेल, असे मत ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound