Home क्राईम किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी; ८ जखमी, ५२ जणांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी; ८ जखमी, ५२ जणांवर गुन्हा दाखल


रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील विश्रामजीन्सी येथे ८ जुलै रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीत आठ जण जखमी झाले, त्यापैकी दोघे गंभीर आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांतील ५२ जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरासमोर लाठी उभी करण्याच्या किरकोळ कारणावरून एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या दंगलीदरम्यान दोन्ही बाजूंनी शिवीगाळ, मारण्याची धमकी देत लाठी, काठी, कुऱ्हाड, लोखंडी सळई, दगड आणि विटांचा वापर करून एकमेकांना मारहाण करण्यात आली.

या घटनेत कर्तार पवार (वय ४५) आणि सुरसिंग पवार (वय ४०) यांना छातीवर व डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर योगेश पवार (वय ३०), सुनील पवार (वय ३८), छोटू पवार (वय २४), रमेश पवार (वय २०), विशाल पवार (वय १८) आणि नारायण पवार (वय ३२) हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी राजू पवार आणि करतार पवार यांनी परस्पराविरोधी तक्रारी दिल्या आहेत. त्यावरून रावेर पोलिस ठाण्यात एकूण ५२ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे विश्रामजीन्सी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड हे पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound