अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी वसलेले ‘इच्छापूर्ती अती जागृत श्री सती माता मंदिर’ संपूर्ण खान्देशातील भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान बनले आहे. सध्या नवरात्रीचे पावन पर्व सुरू असल्याने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अमळनेर शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर पूर्वेला, कुऱ्हे खुर्दे गावाजवळ असलेल्या या मंदिराचे दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी असणे हेच या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि आकर्षण मानले जाते. भाविकांना दर्शनासाठी रेल्वेचे रूळ ओलांडून जावे लागते.

या विशेष स्थानामुळे नवरात्री पर्वात भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. परंतु, सती माता मंदिर ट्रस्टी आणि रेल्वे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी विशेष काळजी घेतली आहे. रेल्वेचे दोन्ही ट्रॅक ओलांडताना भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी आपली सेवा चोख बजावताना दिसत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.
सती माता मंदिराच्या स्थानाबाबत एक चमत्कारी इतिहास सांगितला जातो. जेव्हा या ठिकाणी रेल्वेचे रूळ तयार करण्याचे काम सुरू होते, तेव्हा रेल्वे प्रशासनाने हे मंदिर रूळांच्या मधून हटवून त्याची नूतन वास्तू बाजूला स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने संपूर्ण शक्ती पणाला लावून आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करूनही हे मंदिर आजही त्याच जागी स्थित आहे. मंदिर हटवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचा इतिहास स्थानिक नागरिक सांगतात.
या मंदिराच्या जागृततेची साक्ष म्हणून येथे नवस फेडण्यासाठी अर्पण केलेल्या असंख्य पितळी घंटा आणि लहान स्टीलचे पाळणे आजही दिसून येतात. याव्यतिरिक्त, महिन्यातील दर मंगळवारी या मंदिरात नवसाचे लहान-मोठे महाप्रसादाचे भंडारे मोठ्या श्रद्धेने पार पडत असतात. या जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी केवळ नवरात्रीतच नाही, तर वर्षभर भाविकांची गर्दी असते.



