पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विश्ववंदनीय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर) पारोळा शहरात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विविध क्षेत्रांतील मान्यवर व अनुयायांनी आदरांजली वाहिली.

माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महामानवाला पुष्प अर्पण केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समस्त देशवासीयांना मतदानाचा व निवडणूक लढवण्याचा समान अधिकार दिला. यामुळेच सामान्य नागरिक देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो,’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या अभिवादन कार्यक्रमाला ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र वानखेडे, रविंद्र जावळे, राजेश सरदार, चेतन शिंदे, गौतम जावळे, प्रा. हर्षल सूर्यवंशी, सागर जावळे, मिलिंद सरदार, बिऱ्हाडे नाना, सुनील जाधव, निर्भय मोरे, प्रमोद वानखेडे यांच्यासह समस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वही-पेन संकलनाचा स्तुत्य उपक्रम या अभिवादन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, अविनाश पवार आणि त्यांच्या टीमने राबवलेला एक स्तुत्य उपक्रम. त्यांनी यावेळी अनुयायांना डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार न आणता, एक वही आणि एक पेन आणण्याचे आवाहन केले होते. संकलित करण्यात आलेले हे संपूर्ण शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व देणाऱ्या महामानवाला हे अभिनव अभिवादन सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले आहे.



