Home Cities जळगाव रायपूर गावात ३५० वर्षांपासून एकाच वेळी नारळ फोडण्याची अनोखी प्रथा!

रायपूर गावात ३५० वर्षांपासून एकाच वेळी नारळ फोडण्याची अनोखी प्रथा!


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पुनर्वसित रायपूर गावात तब्बल ३५० वर्षांपासून सुरू असलेली एक अनोखी परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. येथे आषाढी अमावस्येच्या दिवशी संपूर्ण गाव एकाच वेळी एकत्र येते आणि घड्याळाच्या काट्याने बरोबर बारा वाजताच सर्व ग्रामस्थ देवीसमोर एकाच क्षणाला नारळ फोडतात. हा प्रसंग पाहणाऱ्याच्या अंगावर अक्षरशः शहारा आणतो. ही अद्वितीय प्रथा ग्रामदैवत मरिआईच्या पूजेसाठी पाळली जाते.

रायपूर (ता. जळगाव) येथील मरिआई यात्रोत्सव दरवर्षी आषाढी अमावस्येला साजरा होतो. या दिवशी गावात आणि गावाबाहेर वास्तव्यास असलेले सर्व ग्रामस्थ आपल्या मूळ गावात परततात. देवीच्या पूजेसाठी गावातील सर्व पुरुष, तरुण आणि वृद्ध दुपारी बारा वाजण्यापूर्वी मरिआई मंदिरात उपस्थित राहतात. मात्र, परंपरेनुसार घरातील महिला आणि मुली दार बंद करून घरातच थांबतात.

यात्रेपूर्वी गावात दवंडी पिटवून पूजेची माहिती दिली जाते आणि ग्रामस्थांकडून वर्गणी जमा केली जाते. त्यातून पूजेचा नैवेद्य व इतर साहित्य खरेदी केले जाते. पूजेच्या तयारीसाठी पंधरा दिवस आधीच गावात लगबग सुरू होते. या पूजेला पोलीस पाटील यांना विशेष मान दिला जातो. पूजेचे ताट त्यांच्या घरून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने मंदिरात नेले जाते. यंदा ही जबाबदारी पोलीस पाटील रामसिंग परदेशी यांनी पार पाडली.

रायपूर गावात ७० टक्के राजपूत (परदेशी) समाज असूनही, मरिआई यात्रोत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या उत्साहात सामील होतात, हे या परंपरेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यात्रेच्या दिवशी गावातील शाळांनाही सुट्टी दिली जाते. आषाढी अमावस्येला येथे ‘खिचडा अमावस्या’ असेही म्हटले जाते. या दिवशी ग्रामस्थ गव्हाची खीर व दहीभात नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करतात. विशेष म्हणजे, हा नैवेद्य कोणत्याही डब्यातून आणला जात नाही, तर पळसाच्या पानांचे द्रोण बनवून त्यामध्येच नैवेद्य आणला जातो आणि नंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

महिला पूजेत सहभागी होत नाहीत यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १६६४ मध्ये रायपूर गाव वाघूर नदीकाठी वसलेले होते. तेव्हा गावाभोवती डोंगर, वन्यप्राणी व चोरटे यांचा धोका होता. गावावर शत्रूचा हल्ला होऊ नये म्हणून महिला घरातच थांबत आणि पूजेच्या वेळेस घराचे दरवाजे बंद करून स्वतःला ‘कोंडून’ घेत. ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. मात्र, नवरात्रात मात्र महिलाच देवीच्या जागरणाचे नेतृत्व करतात.

तळणीच्या बाबतीतही या गावात विशेष प्रथा आहे. पूजेच्या आदल्या दिवशी सर्वजण तळण करतात, मात्र पूजेच्या दिवशी फक्त पोलीस पाटील यांच्या घरीच तळण केले जाते. हे तळण मरिआईला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. त्यानंतर संपूर्ण श्रावण महिनाभर गावात मांसाहार व तळणीस पूर्णतः मनाई असते. हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. पूजेनंतर पोळ्याच्या दिवशी पोलीस पाटील यांच्या घरून पुन्हा तळण देवीला दाखवूनच गावात तळणला सुरुवात होते.


Protected Content

Play sound