जामनेरात मराठी भाषा गौरव दिनाचा अनोखा सोहळा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेरमध्ये आनंदयात्री परिवार या संस्थेने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमातून मराठी भाषेचा २ हजार वर्षांचा इतिहास गाणी आणि कवितांमधून यशस्वीपणे सादर करण्यात आला.

या कार्यक्रमात महानुभाव पंथ, संत साहित्य, पंडिती काव्य, शाहिरी साहित्य, पोवाडा, लावणी ते आधुनिक साहित्य असा मराठी भाषेच्या विकासाचा आढावा घेण्यात आला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्यापासून ते बा. सी. मर्ढेकर, केशवसूत, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, इंद्रजित भालेराव, संदीप खरे, अशोक कोळी यांच्यापर्यंतच्या साहित्यिकांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जे. के. चव्हाण, प्रकाश पाटील, श्रीराम महाजन आणि मोहन सारस्वत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. रांजणी येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य आणि जिनियस शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाची संकल्पना आनंदयात्री संस्थेची होती. गणेश राऊत यांनी निवेदन आणि संहिता लेखन केले, तर अंजली देशपांडे, डॉ. स्वाती विसपुते, अनिता पाटील, कांचन महाजन, खुशी पांडे, करुणा सुरडकर, पलक देसले, विजय जोशी, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. अमोल सेठ यांनी सादरीकरण केले. राहुल कासार (तबला) आणि रऊफ शेख (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.

सुंदर अक्षर घडवण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून विनामूल्य कार्यशाळा घेणारे शिक्षक सुभाष मोरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्री. कडू माळी, प्रा. जे. पी. पाटील, डॉ. आशिष महाजन, डॉ. नरेश पाटील, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पराग पाटील, अमरीश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जामनेरमधील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content