Home राजकीय राज्यसभेच्या एक जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच !

राज्यसभेच्या एक जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच !


मुंबई-वृत्तसेवा |  निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांच्या राज्यसभा निवडणुका जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सात जागा रिक्त होणार असल्या तरी संख्याबळाच्या समीकरणामुळे महाविकास आघाडीला केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता असल्याने या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत महाविकास आघाडीत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संधी दिली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीकडे राज्यसभेसाठी एकच जागा आहे आणि तेवढेच संख्याबळ उपलब्ध आहे. त्यामुळे आधी अंतिम निर्णय होऊ द्या, त्यानंतरच पुढील गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले.

यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेबाबत रोटेशनचा मुद्दा उपस्थित करत यावेळी शिवसेनेचा खासदार राज्यसभेत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच त्यासाठी शिवसेनेकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्यामुळे राज्यसभेसाठी शरद पवार यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी आणि अस्मितेसाठी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वाची निवड करतील. हा निर्णय एकमतानेच होईल. आदित्य ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य असून शरद पवार हे देशातील अत्यंत मोठे आणि अनुभवी नेते आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेते राज्यसभेतून निवृत्त होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना राऊत यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे, ही स्वाभाविक अपेक्षा आहे. त्यामुळे तीनही पक्ष एकत्र बसून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील. काँग्रेसचा अंतिम निर्णय हा दिल्लीतील नेतृत्वाकडून घेतला जातो, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णय मुंबईत घेतले जातात, असे त्यांनी नमूद केले.

तसेच राज्यसभेसाठी जर कोणाला संधी दिली गेली, तर त्याबदल्यात दुसऱ्या पक्षाला विधान परिषदेची संधी मिळू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र काँग्रेसलाही विधान परिषदेत आमदार पाठवण्याची इच्छा असल्याने उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर जाण्याची शक्यता सध्या कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी महाविकास आघाडीत सुरू असलेली ही राजकीय घडामोड आगामी काळात कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या निर्णयातून महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वय आणि राजकीय रणनीती स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound