वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील हतनुर शिवारातील बोहर्डीरोडवर गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारे आयशर ट्रक रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता वरणगाव पोलीसांनी पकडला आहे. या कारवाईत १८ म्हशींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील हतनुर शिवारातील बोहर्डी गावाजवळील रोडवरून निर्दयीपणे गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती वरणगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पथकाने कारवाई करत बोहर्डी गावाजनकीच्या रोडवर आयशर ट्रक पकडला.यात दाटीवाटीने व कोंबून १८ म्हशींची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी वाहन जप्त केले असून म्हशींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोकॉ ईश्वर तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रईस कामीन मेवाती सादीक अयुब खान दोन्ही रा. झोकर जि.शाजापूर मध्यप्रदेश यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.