रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रशासन म्हणजे केवळ आदेश, पत्रव्यवहार आणि दुरूनच केलेले निर्णय, असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र रावेर तालुक्यातील तहसीलदार बंडू कापसे हे या समजाला आपल्या कार्यशैलीने पूर्णपणे छेद देत आहेत. महसूल दिन सप्ताहानिमित्त आयोजित शिबिरांच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या एका भेटीने प्रशासनातही माणुसकीचा स्पर्श कसा असतो, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.
रोझोदे गावातील ७० वर्षीय दिव्यांग महिला सिंधूबाई ज्ञानदेव चौधरी या श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थिनी आहेत. त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात योजना लाभ मिळावा यासाठी तहसीलदार कापसे स्वतः त्यांच्या घरी गेले. केवळ औपचारिक भेट न देता त्यांनी सिंधूबाईंच्या ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया त्यांच्या घरीच पूर्ण केली. हाच माणुसकीचा खरा स्पर्श ठरला आणि सिंधूबाईंच्या डोळ्यांतून भावना अश्रूंमधून ओसंडून वाहू लागल्या.

“अहो, तहसीलदारसाहेब आमच्या घरापर्यंत येतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांनी एवढं प्रेमाने विचारपूस केली, आम्हाला माणूस समजून घेतलं… डोळ्यांत पाणी आलं,” असं भावनिक उद्गार सिंधूबाईंनी दिले.
फक्त सिंधूबाईच नव्हे, तर अशा अनेक वृद्ध, एकटे आणि दिव्यांग लाभार्थ्यांना तहसीलदार कापसे स्वतःहून भेटत आहेत. कोणतीही मोठी योजना जाहीर न करता, केवळ माणूस म्हणून केलेली ही भेट त्यांच्या प्रशासकीय भूमिकेपेक्षा खूप मोठी ठरत आहे.
बंडू कापसे यांचा कार्यशैलीतला झोकून देणारा आणि मानवी भावनांना समजून घेणारा स्वभाव प्रशासनाच्या प्रतिमेला एका वेगळ्या उंचीवर नेतो आहे. आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यात “आपले तहसीलदार खरोखर आपले आहेत” असं अनेक जण सांगताना दिसत आहेत.
तहसीलदार केवळ सरकारी निर्णय अंमलात आणणारे अधिकारी नसून, गरजूंना धीर देणारे, आपुलकीचा हात पुढे करणारे आधारवड असू शकतात, हे रावेर तालुक्यातील जनतेने प्रत्यक्ष अनुभवलं आहे.



