जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ मध्ये ग्राहक बनून सोन्याची चेन लंपास करणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या सोन्यापासून बनवलेली सोन्याची लगड देखील हस्तगत केली असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सुभाष चौकातील नयनतारा अँड सन्स (आर.सी. बाफना ज्वेलर्स) मध्ये एक अज्ञात इसम सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने सेल्समनला बोलण्यात गुंतवून १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन २ लाख ४९ हजार अत्यंत शिताफीने चोरून नेली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी तेलंगणा राज्यातील सायबरबाद परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीच्या पथकाने तत्काळ तेलंगणा गाठून भास्कर किसन बानोथ (वय २२ वर्षे, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.
ओळख पटू नये म्हणून सोन्याची लगड पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. चोरीचा माल खपवताना आपली ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने त्याने चोरलेली सोन्याची साखळी वितळवून त्याची सोन्याची वीट बनवली होती. पोलिसांनी त्याच्याकडून ही लगड जप्त केली असून गुन्ह्याचा शंभर टक्के मुद्देमाल मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
यशस्वी पथक ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वल्टे, आणि कर्मचारी प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर व महेश सोमवंशी यांनी केली आहे.



