संगमनेरात घडली अज‍ब घटना; कुत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संगमनेर तालुक्यातील एका घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका रॉटवेलर प्रजातीच्या कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने “खलनायक” ठरलेला कुत्रा आणि “कर्तव्यदक्ष” पोलीस चर्चेचा विषय बनले आहेत.

तक्रारदार महिला संगमनेर शहरालगतच्या मळ्यात राहते. याच परिसरात डॉ. पानसरे यांचा निवास असून, त्यांनी रॉटवेलर प्रजातीचा कुत्रा पाळला आहे. हा कुत्रा आक्रमक स्वभावाचा असून रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना सतत त्रास देतो. घटनेच्या दिवशी महिला आपल्या दुचाकीवरून जात असताना, कुत्र्याने अचानक जोरजोराने भुंकत फाटकाच्या आतून धाव घेतली. कुत्रा फाटक ओलांडू शकला नसता, तरी त्याच्या वर्तनामुळे महिला घाबरली. गोंधळलेल्या महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट झाडावर आदळली. या अपघातामुळे महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्या दुचाकीचेही नुकसान झाले.

अपघातानंतर महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब नोंदवला. या जबाबामध्ये महिलेला झालेल्या अपघातासाठी कुत्र्याला जबाबदार ठरवण्यात आले. परिणामी, पोलिसांनी कुत्र्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऐकणाऱ्यांना अतिशय काल्पनिक वाटत असला, तरी तो प्रत्यक्षात घडला आहे. आता खलनायक ठरलेल्या कुत्र्यावर पोलीस काय कारवाई करणार, याबाबत परिसरात चर्चा आहे. या घटनेमुळे प्राणीमालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांवर लक्ष ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हेही स्पष्ट झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हा अनोखा आणि विचित्र प्रकार स्थानिकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

Protected Content