बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीने घरी जात असलेल्या दोन मित्रांना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना बोदवड तालुक्यातील रेवती गावाजवळ घडली आहे. या संदर्भात बोदवड पोलीस ठाण्यात ट्रक चालक आणि मालक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. विकास सुभाष सावळे वय-२२, रा. रेवती ता.बोदवड असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील रेवती गावात विकास सावळे हा तरूण वास्तव्याला होत्या. दरम्यान शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास विकास सावळे हा त्याचा मित्र दीपक देविदास शेजोळे यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ एबी ९३१२) ने येवती गावाकडून रेवती गावाकडे जात असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ६४२८) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विकास सावळे याचा जागेवर मृत्यू झाला तर सोबत असलेला दीपक शेजोळे हा गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत बोदवड पोलिसात तक्रार देण्यात आली, त्यानुसार ट्रकचालक रामचंद्र काशिनाथ म्हस्के रा.शेलवड ता.बोदवड आणि विकास प्रकाश बावस्कर रा.मुक्तळ ता. बोदवड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर शेजवडे हे करीत आहे.