अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते धरणगाव रस्त्यावर एका भरधाव महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना अमळनेर जवळील बुलढाणा अर्बनच्या गोडाऊन समोर सार्वजनिक जागी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल राजू चव्हाण (रा. हनुमान नगर, पारोळा नाका, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचे भाऊ नरेंद्र राजू चव्हाण (वय ३९ वर्ष) हे आपली मोटरसायकल (क्रमांक एमएच -१९-डीबी-६६७९) घेऊन धरणगावकडून येत होते. त्यांच्या सोबत दुचाकीवर त्यांचे नातेवाईक विश्वास रोहिदास सोनवणे (वय ४२ वर्ष, रा. भाडणे, ता. साक्री, जि. धुळे) हे देखील बसलेले होते.

९ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास, अमळनेर ते धरणगाव रोडवरील बुलढाणा अर्बन गोडाऊनजवळ समोरून येणाऱ्या एका महिंद्रा कंपनीच्या बोलेरो मॅक्स पिकअप गाडीने (क्रमांक एमएच ३९ एडी ३११९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात नरेंद्र चव्हाण आणि विश्वास सोनवणे या दोघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू ओढवला.
अपघातग्रस्त पिकअप गाडीच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत मोटरसायकलचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
पोलीस कारवाई या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी अमोल चव्हाण यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार नामदेव बोरकर पुढील तपास करत आहेत.



