वरळीत भरधाव बीएमडब्लू कारची दुचाकीला धडक; दुचाकीवरील महिला जागीच ठार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील वरळी येथे बीएमडब्लू वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली आणि त्या दोघांना फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी पहाटे ५.३० वाजता हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर अपघात प्रकरणात बीएमडब्लू वाहनाचे मालक हे शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती टाइम्स नाऊ या संकेतस्थळाने दिली.

वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ अपघात घडला आहे. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात सदर दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉकला मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या बीएमडब्लू वाहनानं धडक दिली. दुचाकीवर मासळी असल्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या पतीचं दुचाकीवर नियंत्रण सुटलं. त्यामुळे दोघेही वाहनाच्या बोनेटवर धडकले. पतीने बोनेटवरून बाजूला उडी घेतली. मात्र महिलेले वेळीच बाजूला होता आले नाही. त्यातच बीएमडब्लूच्या चालकाने वाहन पळविल्यामुळे महिलाही वाहनाबरोबर १०० मीटरपर्यंत फरफटत गेली.

अपघातानंतर दाम्पत्याला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने महिलेचा यात मृत्यू झाला. तर तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बीएमडब्लू वाहन ताब्यात घेतले असून अपघातानंतर चालकाने पळ काढला होता. त्यालाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. वरळी पोलीस ठाण्यात सदर अपघाताची सखोल चौकशी केली जात असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही वरळीत पोहोचले आहेत.

Protected Content