Home क्राईम भरधाव दुचाकीची जोरदार धडक; तरूण शिक्षक गंभीर जखमी !

भरधाव दुचाकीची जोरदार धडक; तरूण शिक्षक गंभीर जखमी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात डी-मार्ट परिसराजवळ रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या एका तरुण शिक्षकाला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. १२ जुलै रोजी सायंकाळी घडलेल्या या अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला होता. या संदर्भात अखेर सोमवारी २१ जुलै रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धांत अरविंद जगताप (वय-३४, रा. पाचोरा) हे १२ जुलै रोजी कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आले होते. सायंकाळी ते डी-मार्टमधून काही वस्तू खरेदी करून घरी जाण्यासाठी शिरसोली रोडवर रिक्षाची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी इच्छादेवीकडून शिरसोली रोडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीसी ९४९९) ने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे सिद्धांत जगताप यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडवून दुचाकीस्वार घटनास्थळावरून आपल्या दुचाकीसह पसार झाला होता. जखमी अवस्थेत असलेल्या शिक्षक सिद्धांत जगताप यांच्यावर जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

या घटनेची गंभीर दखल घेत, सोमवारी २१ जुलै रोजी दुपारी एक वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास कुंभार करत आहेत.


Protected Content

Play sound