जळगाव, प्रतिनिधी | के.सी.ई.सोसायटी संचालित शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि जनसंवाद व पत्रकारिता विभाग, मूळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोती’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ‘विशेष शो’चे शनिवारी (दि.१४) आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य ए.आर.राणे यांनी दिली आहे.
शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे सकाळी ११.०० वाजता होणाऱ्या या ‘विशेष शो’ला चित्रपटाचे दिग्दर्शक सुहास भोसले उपस्थित राहणार आहेत. या शो नंतर उपस्थितांशी ते मुक्तसंवाद साधणार आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्टीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला ‘कोती’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल, कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हल, केरळ फिल्म फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण या सारख्या महोत्सवांत पाररितोषिके पटकावलेल्या तसेच कान्स व बर्लिन फेस्टिव्हलमध्ये आपली स्वतंत्र छाप उमटवलेल्या या चित्रपटात मनोरंजनातुन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘कोती’ म्हणजे तृतीयपंथी. आणि त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची ‘कोती’ मानसिकता. समाजातील तृतीयपंथी या उपेक्षित घटकाच्या बालपण तथा मानसिकतेचे यथार्थ चित्रण या चित्रपटात करण्यात आलेले आहे. या ‘विशेष शो’ला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, जनसंवाद व पत्रकारिता या विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार यांनी केले आहे.