बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जानकर यांच्यानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडली आहे. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचे शिवसंग्राम पक्षाने जाहीर केले आहे. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती विनायक मेटे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
विनायक मेटे यांचे निधन झाल्यानंतर शिवसंग्रामला सत्तेत वाटा मिळाला नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही सुटला नाही. शिवसंग्रामचा राजकीय पटलावरती विचार केला नाही. शिवसंग्राम ज्यांच्या सोबत असेल ते विजयापर्यंत जातील. शिवसंग्राम सोबत नसेल त्यांचा पराभव होईल. आरक्षणाच्या प्रश्नावर मराठवाड्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता मतपेटीतून बाहेर पडेल. महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत देण्यासाठी अनुकूल नसेल तर शिवसंग्राम स्वतंत्र लढणार असल्याचेही ज्योती मेटे यांनी सांगितले.