रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी जि.प. सदस्य रमेश नगराज पाटील यांच्यासह येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक तसेच त्यांचे समर्थक आज अजितदादा पवार गटात सहभागी होणार असल्याचे वृत्त असून यामुळे आमदार एकनाथराव खडसे यांना जोरदार धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
आराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर तालुक्यातील सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि त्यांचे समर्थक वगळता बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शरद पवार गटातच राहिले होते. मात्र आता निवडणुकीच्या आधी मोठे फटाके फुटणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. यात माजी जि.प. सदस्य रमेश नगराज पाटील, त्यांचे पुत्र तथा बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील आणि काही संचालक हे आज अजितदादा पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रसंगी रमेश पाटील यांचे सर्व समर्थ दादा गटात प्रवेश करणार असून आज सायंकाळी हा सोहळा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रमेश नगराज पाटील हे फायरब्रँड नेते समजले जातात. त्यांच्या माध्यमातून एक खंदा नेता हा अजितदादा गटात जाणार असल्याचा सर्वात मोठा फटका हा आमदार एकनाथराव खडसे यांना बसणार आहे. कारण रमेश पाटील हे आतापर्यंत नाथाभाऊंच्या सोबत होते. तर रावेर सारखी जिल्ह्यातील अग्रगण्य कृषी उत्पन्न बाजार समिती देखील खडसे यांच्या हातून जाणार असून अजित पवार यांच्या गटाला तालुक्यात मोठी ताकद मिळणार आहे. सामाजिक दृष्टीने विचार केला असता, मराठा समाजातील एक मोठी ताकदवान फळी ही अजितदादा यांच्या सोबतीला जाणार असून याचा रावेर-यावल तसेच मुक्ताईनगर-बोदवड मतदारसंघातील समीकरणांवर फरक पडणार असल्याचे मानले जात आहे.