मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात आता दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असून मंत्रीमंडळ विस्तारात याची धुरा बच्चू कडू यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.
राज्यात लवकरच दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रीमंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे वृत्त एबीपी-माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. यानुसार, दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावं म्हणून आमदार बच्चू कडू अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. अखेर त्यांच्या लढ्याला आज यश आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यासंदर्भात मान्यता दिल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू वाटून निर्णयाचं स्वागत केलं.
राज्य सरकारच्या या निर्णयावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, या संबंधित बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. दिव्यांगांच्या हक्कांसाठी आम्ही गेली २५ ते २६ वर्षे लढा देतोय, त्याला आता यश आलं आहे. जागतिक अपंग दिनादिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार या मंत्रालयाची धुरा ही कडू यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.