जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्याचा आढावा घेवून विकास कामांसाठी शासनाकडून येणाऱ्या निधीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
जिल्हा आढावा बैठकीला आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांसदर्भात चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षाच्या आर्थीक नियोजनात यावर्षी अधिक निधी मिळावा यासाठी सर्वांनी नियोजन करावे. त्यानुसार शासनाकडून निधी प्राप्त होण्यासाठी आवश्यक असा अहवाल सादर करावा लागणार आहे. ‘जळगाव जिल्हा विकासासाठी यंदा ६०० कोटी रूपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून यात किमान २०० कोटी रूपये तरी जास्तीचे मिळतील !” असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
आगामी अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागामार्फत मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावासाठी आदिवासी उपयोजनेत प्रत्येक जिल्ह्यांची निधीच्या मागणीसंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात गेल्या वर्षी केलेल्या निधीचा विनियोग, पुढील आर्थिक वर्षासाठीची मागणी तसेच अतिरिक्त मागणी, विविध योजनांची प्रगतीपथावरील कामे, नवीन कामांचा प्रस्ताव आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.