एकाच दिवसात १५० विना तिकीट प्रवासी पकडण्याचा अनोखा विक्रम !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कार्यरत असलेल्या मुस्लिम महिला टीटीई रुबीना आकिब इनामदार यांनी विक्रमी तिकिट तपासणी करून रेल्वे प्रशासनासह सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकिटांची तपासणी सुरू आहे. मध्य रेल्वेनेही आपल्या गाड्यांमध्ये तिकिटांची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू केली आहे. यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कार्यरत असलेल्या महिला टीटीई रुबीना आकिब इनामदार यांनी विक्रमी तिकिट तपासणी करून रेल्वे प्रशासनासह सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रुबीना आकिब इनामदार यांनी एका दिवसात विक्रमी तिकिट तपासणी केली. सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी त्यांनी ड्युटीदरम्यान 150 अनियमित आणि बिनतिकीट प्रवासी पकडले. यामुळे रेल्वेला तिकिट तपासणीतून 45,705 रुपयांचा महसूल मिळाला. विशेष म्हणजे, रुबीना यांनी फर्स्ट क्लासमध्ये बिनतिकीट प्रवास करणाऱ्या 57 प्रवाशांना पकडले आणि त्यांच्याकडून दंड म्हणून 16,430 रुपये वसूल केले.

सेंट्रल रेल्वेने रुबीना यांच्या या कामगिरीची दखल घेत सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले आहे. त्यांना एका दिवसातील तिकिट तपासणीचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल ‘रॉकस्टार’ संबोधून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. सोशल मीडिया वापरकर्तेही रुबीना यांच्या या कामगिरीचे कौतुक करत आहेत आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. काही वापरकर्त्यांनी इतर टीटीईंनाही यातून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला आहे.

सेंट्रल रेल्वेनुसार, रुबीना या मुंबईतील तेजस्विनी सेकंड बॅचच्या तिकिट तपासणीस ( टीटीआय ) आहेत. सेंट्रल रेल्वेने त्यांच्या तिकिट तपासणीच्या कामादरम्यानची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. सेंट्रल रेल्वेचा मुंबई विभाग सर्व प्रवाशांना त्रासमुक्त आणि आरामदायी प्रवास तसेच उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात तिकिट तपासणी केली जात आहे, जेणेकरून बिनतिकीट प्रवासाला आळा बसेल. ही तपासणी मुंबई उपनगरीय लोकल, मेल, एक्सप्रेस, प्रवासी गाड्या आणि सुट्टीतील विशेष गाड्यांमध्येही केली जात आहे.

Protected Content