Home आरोग्य नैराश्याच्या गर्तेतून आशेचा प्रकाश; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ३३ वर्षीय रुग्णाला नवजीवन

नैराश्याच्या गर्तेतून आशेचा प्रकाश; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ३३ वर्षीय रुग्णाला नवजीवन


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जीवनातील दुःखद घटना, मानसिक तणाव आणि व्यसनाधीनतेमुळे नैराश्यात अडकलेल्या एका ३३ वर्षीय तरुणाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी यशस्वी उपचारांच्या माध्यमातून नवजीवन दिले आहे. या रुग्णाच्या उपचाराची कहाणी केवळ वैद्यकीय यशाची नसून, समाजात मानसिक आरोग्याबाबत जागृती निर्माण करणारी ठरली आहे.

सुमारे दहा महिन्यांपूर्वी रुग्णाच्या वडिलांचे अचानक निधन झाले. या घटनेचा खोल मानसिक आघात बसल्याने रुग्णामध्ये हळूहळू नैराश्याची लक्षणे दिसू लागली. त्याचदरम्यान मद्यपानाची सवय लागून ती व्यसनात परिवर्तित झाली. वाढत्या मानसिक तणावाखाली रुग्णाने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र वेळीच मिळालेल्या मदतीमुळे त्याचे प्राण वाचले.

कुटुंबीयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विलंब न करता रुग्णाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले. येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमा चांदूरकर, हिमांशू जाधव, डॉ. ऋचिता आटे आणि डॉ. देवांश गणात्रा यांनी रुग्णाचे सखोल मानसिक व शारीरिक मूल्यांकन केले. त्यानंतर ईसीटी, औषधोपचार, समुपदेशन आणि व्यसनमुक्ती उपचारांचा समन्वय साधत सविस्तर उपचार योजना राबविण्यात आली.

उपचार प्रक्रियेत वैयक्तिक समुपदेशनासोबतच कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग, गटचर्चा, योग व ध्यानधारणा यांचा प्रभावी वापर करण्यात आला. सातत्यपूर्ण उपचार, सकारात्मक मानसिक आधार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे काही आठवड्यांतच रुग्णाच्या मानसिक स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. सध्या रुग्ण पूर्णपणे व्यसनमुक्त असून तो पुन्हा आपल्या दैनंदिन कामकाजात सक्रिय झाला आहे. मानसोपचार विभागातील तज्ज्ञांनी सांगितले की, नैराश्य किंवा मानसिक आजार लपवून ठेवण्याऐवजी वेळीच ओळखून उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. आधुनिक उपचारपद्धती, प्रशिक्षित तज्ज्ञ आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळे अशा रुग्णांना नवजीवन देणे शक्य होत आहे.


Protected Content

Play sound