
चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मोहम्मद रागीब मोहम्मद उस्मान यांनी सिंगापूरमधील प्रतिष्ठित नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी येथून २०२५–२६ या शैक्षणिक सत्रात पोस्ट-डॉक्टरेट ही मानाची पदवी संपादन करून शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे चोपडा शहरासह उत्तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.

नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य संशोधन विद्यापीठांपैकी एक मानली जाते. या विद्यापीठातून मिळालेली पोस्ट-डॉक्टरेट पदवी ही संबंधित विद्यापीठ तसेच युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, नवी दिल्ली यांच्याकडून मान्यताप्राप्त आहे. ही पदवी मिळविणे म्हणजे अत्यंत कठोर संशोधन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शैक्षणिक बांधिलकीचे प्रतीक मानले जाते. डॉ. मोहम्मद रागीब यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती आणि संशोधनातील सातत्यामुळे ही प्रतिष्ठित पदवी मिळवून संस्थेचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
डॉ. मोहम्मद रागीब हे मागील १८ वर्षांपासून महाविद्यालयात फार्मकॉग्नोसी विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून ते NAAC समन्वयक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. संशोधन क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या नावावर आतापर्यंत २७ पेटंट्स, १८० हून अधिक पुस्तके, १९० संशोधन पेपर्स आणि १८५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सादरीकरणे नोंदलेली आहेत. संशोधन आणि ज्ञानवृद्धीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरित केले आहे.
ते बी. फार्मसी, एम. फार्मसी आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मान्यताप्राप्त मार्गदर्शक असून पीसीआय (Pharmacy Council of India) चे निरीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज आणि बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचे मान्यवर सदस्य म्हणूनही योगदान देत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत ३८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांचे नाव “हूज हू” या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.
डॉ. मोहम्मद रागीब यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल महाविद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे, रजिस्ट्रार प्रफुल्ल मोरे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



