मुंबईजवळ उभारण्यात येईल प्रति तिरूपती बालाजी मंदिर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवी मुंबईजवळ उलवे येथे १० एकर जागेवर उभारण्यात येत असलेल्या प्रति तिरुपती बालाजी मंदिराचा पायाभरणी समारंभ नुकताच पार पडला. रेमण्ड उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या हस्ते पायाभरणी कार्यक्रम पार पडला असून प्रत्यक्ष मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. या प्रसंगी शिवसेना -ठाकरे गटाचे आमदार, तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य मिलिंद नार्वेकर आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमचे अधिकारी उपस्थित होते. या मंदिराच्या जागेचे भूमिपूजन गेल्यावर्षी करण्यात आले होते. सेक्टर १२ मध्ये प्रति तिरुपती बालाजी मंदिर उभारणीसाठी राज्य सरकारने सिडकोच्या मालकीची १० एकर जागा एप्रिल २०२२ मध्ये दिली होती. एमटीएचएलद्वारे या जागेचा कास्टिंग यार्ड म्हणून उपयोग केला जात होता.

मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागातील जे भाविक काही कारणास्तव आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराला भेट देऊ शकत नाहीत अशांसाठी उलवे, नवी मुंबई येथे भगवान व्यंकटेश्वर बालाजीचे प्रति मंदिर उभारण्यात येत आहे. शिवाय उलवे येथील हे मंदिराचे ठिकाण हे आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असल्याने बाहेरहून येणाऱ्या भाविकांसाठी व्यवहार्य स्थान होणार आहे. तिरुपतीच्या बालाजी मंदिर ट्रस्टतर्फे आंध्र प्रदेश राज्याबाहेर उभारण्यात येत असलेले हे सहावे प्रति मंदिर आहे. यापूर्वी हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, दिल्ली आणि भुवनेश्वर येथे प्रति बालाजीचे मंदिर उभारण्यात आले आहे.

Protected Content