नाकाबंदी दरम्यान पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने उडविले

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नांदेडमध्ये एक भयानक अपघात घडला आहे. नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वरील दोन जिल्ह्याच्या व तीन तालुक्याच्या सीमेवर चोरंबा फाटा येथे नाकाबंदी पॉईंट आहे. याठिकाणी अवैध वाहतुकीची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने पोलीस कर्मचाऱ्याला उडविले. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १ जूनच्या सकाळी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. अपघातात अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राम मुगाजी पवार यांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरंबा फाटा हे दोन जिल्हे आणि तीन तालुके असलेल्या पॉईंटवर मागील काही दिवसांपासून नाकाबंदी चौकी उभारण्यात आली आहे. नागपूर मार्गाकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती. 1 जून रोजी पोलीस कर्मचारी पिकअप क्रमांक एम. एच – 20 ई. जी.7844 या वाहनाची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेला ट्रक क्रमांक आर. जे. 09 – जी. सी. 9945 ट्रकने पोलीस हवालदार राम पवार यांना उडविले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्र वसमत फाटा येथील रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पिकअप व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या अपघात प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहन चालकावर आणि वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Protected Content