सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पणन विभागाच्या १०० दिवसांतील कामकाजाचा आढावा घेताना ते सह्याद्री अतिथीगृह येथे बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीसाठी तयारी नोव्हेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्येच पूर्ण करून खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. समृद्धी महामार्गालगत ऍग्रो हब व मॅग्नेट प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या हबसाठी सर्व सोयी-सुविधा देण्यावर त्यांनी भर दिला. राज्यातील चार विभागांमध्ये ऍग्रो लॉजिस्टिक हब उभारण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कांदा साठवणुकीसाठी अधिक चाळी उभारून अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबईत उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘महा बाजार’ प्रकल्पाची माहिती दिली. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रत्येक तालुक्यात स्थानिक उत्पादनांसाठी बाजार समित्या उभारण्याची घोषणा केली. जाभूरगाव येथे उभारलेल्या ऍग्रो हबचे लोकार्पण येत्या ४५ दिवसांत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, व अन्य मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

Protected Content