अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत शिपायाविरुद्ध लाचमागणीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चितीचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगरपरिषद अमळनेर येथील आस्थापना विभागातील शिपाई मनोज साहेबराव निकुंभ यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत कर्मचारी असून त्यांना १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनुसार लागू होणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा हप्ता अद्याप मंजूर झाला नव्हता. या संदर्भात आवश्यक प्रक्रिया व मंजुरीबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी नगरपरिषद कार्यालयातील शिपाई मनोज निकुंभ यांच्याशी संपर्क साधला असता, आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चितीचा दुसरा हप्ता तसेच मुख्याधिकाऱ्यांकडून मंजुरी करून आणून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या लाचमागणीबाबत तक्रारदार यांनी दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे अधिकृत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष लाचमागणी पडताळणीची कार्यवाही करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी लोकसेवक मनोज निकुंभ यांनी आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चितीचा लाभ मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता संबंधित आरोपीने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाचमागणी स्पष्ट झाल्याने अमळनेर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५१९/२०२५ नुसार करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, आरोपी मनोज निकुंभ यांच्याविरुद्ध यापूर्वीही सन २०१९ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून तो न्यायप्रविष्ट असल्याची माहिती लाचलुचपत विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचमागणीचा आरोप झाल्याने नगरपरिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ही संपूर्ण कारवाई नाशिक परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणावर पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांनी पर्यवेक्षण केले असून, सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. जळगाव येथील सापळा पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे करीत आहेत.



