सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालय, सावदा येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांना सन २०२३-२४ मध्ये विद्यापीठ परीक्षेत्रातील ‘उत्कृष्ट शारीरिक शिक्षण संचालक’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही बाब विशेषतः उल्लेखनीय आहे कारण विद्यापीठाच्या इतिहासात हा पहिलाच पुरस्कार देण्यात आला असून, प्रा. डॉ. मारतळे यांनी संपूर्ण परीक्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

१८ ऑगस्ट २०२५ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या एका भव्य सोहळ्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. कुलकर्णी सर आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी सर यांच्या हस्ते प्रा. डॉ. गोविंद मारतळे व त्यांच्या सौ. सुशीला मारतळे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

प्रा. डॉ. मारतळे यांनी गेल्या अनेक वर्षांत विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक शिक्षणाचे धडे दिले नाहीत, तर महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन करून त्यांच्यात विजयी आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या प्रशिक्षणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करून संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या गौरवप्राप्तीनंतर त्यांच्या सत्कारासाठी अनेक मान्यवरांनी अभिनंदनपर संदेश दिले. मधुस्नेह परिवाराचे कुटुंब प्रमुख व तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, संचालक मंडळातील सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार व माजी खेळाडूंनी प्रा. डॉ. मारतळे यांचे हार्दिक अभिनंदन केले.
प्रा. डॉ. गोविंद मारतळे यांनी या पुरस्काराबद्दल आपले कृतज्ञता व्यक्त करताना विद्यापीठाचे कुलगुरु, संपूर्ण विद्यापीठ प्रशासन, तापी परिसर विद्यामंडळ, सहकारी प्राध्यापक, कर्मचारी, मित्रमंडळी आणि कुटुंबियांचे विशेष आभार मानले. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.



