विशाळगड परिसरातील नव्या वनस्पतीला शिवरायांचे नाव

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विशाळगडाचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती या परिसरात आढळतात. एका संशोधकाने येथील नव्या वनस्पतीचा शोध घेतला आहे. आणि त्याहूनही विशेष म्हणजे या नव्या वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासगटाने याच संशोधन केले. इतिहासात विविध घडामोडींनी गाजलेल्या विशाळगड परिसरात एका नव्या वनस्पतीचा शोध लागला आहे.

शोध लावणाऱ्या संशोधकांनी या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचं नाव दिले आहे. ही वनस्पती कंदीलपुष्प कुळातील आहे. कोल्हापुरातील वनस्पती अभ्यासकांनी विशाळगड परिसरात आढळून आलेल्या या नव्या प्रजातीला ‘सेरोपेजिया शिवरायीना’ असे नाव दिले. जैवविविधता या विषयावर किल्ल्यांवर संशोधन करणारे फार कमी जणे भेटतात. कोल्हापुरातल्या या संशोधकांनी मात्र गडकिल्ल्यांवरील वनस्पतींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामुळेच दुर्मीळ प्रजाती आणि नवीन प्रजाती आता समोर येऊ लागल्या आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून गड किल्ल्यांवर संशोधन करणारे अभ्यासक नवनवीन वनस्पतींचा शोध घेत आहेत. अनेक दुर्मीळ प्रजाती यांना आढळून आलेले आहेत. विशाळगड परिसरात सापडलेल्या नव्या वनस्पतीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळालेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. एस आर यादव या अभ्यासगटाने यावर संशोधन करून याचा शोध लावलेला आहे. संशोधक अक्षय जंगम, रतन मोरे आणि डॉक्टर निलेश पवार यांचे यासाठी विशेष योगदान आहे. छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखली जाणारी सेरोपेजिया शिवरायीना पाहण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

 

Protected Content