
रावेर (प्रतिनिधी ) शेतीच्या विकासासाठी कृषी विद्यापीठे नवनवीन संशोधन सातत्याने करीत असून शेतकऱ्यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहचविण्यावर भर असला तरी शेतकऱ्यांचे शेतीतील प्रयोग थक्क करणारे आहेत. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषीसेवकतर्फे पुरस्कार देऊन त्यांचा होणारा सन्मान निशितच समाजाला नवी दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
येथील माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कृषीसेवक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात पुरस्कार वितरण करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल व कृषी मंत्री आ. एकनाथराव खडसे होते. माजी कृषी आयुक्त डॉ. पांडुरंग वाठारकर यांच्या हस्ते नांगरपूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती सुरेश धनके, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष के.बी. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. लोखंडे, शास्त्रज्ञ बी. डी. जडे, कृषी समर्पण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनायक शिंदे, राज्य कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस-पाटील, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण महासंघाचे(रोमीफ)चेअरमन डॉ. प्रशांत नाईकवाडी, माऊली फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, उद्योजक जितेंद्र पवार, डॉ. प्रशांत सरोदे, उद्योजिका तथा लेखिका कविता पवार, संपादक कृष्णा पाटील, मुकुंद पिंगळे, प्रल्हाद पाटील, दिलीप कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री. पटेल मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न असून उत्पादित मालाला अधिक दर मिळावा या हेतूने हमी भाव योजना सुरु केली आहे. तसेच आयात व निर्यात केल्या जाणाऱ्या शेती उत्पादनाचे धोरण ठरविल्याने त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावात झाला आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महेश कडूस यांनी मनोगत व्यक्त करतांना कृषी पदवीधरांचे प्रश्न मांडले. प्रास्ताविक संपादक कृष्णा पाटील यांनी केले. सूत्रसंचलन ज्योती राणे यांनी तर राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले.
शेतकरीच खरे संशोधक : आ. खडसे
कुठल्याही सोयीसुविधा नसताना शेतकरी रात्रंदिवस शेतीत काबाडकष्ट करून अधिक उत्पादन घेत त्यातून नवीन तंत्र विकसित करतो अशा शेतकऱ्यांचा साप्ताहिक कृषीसेवकने केलेला सन्मान अभिनंदनीय आहे. असे पुरस्कार प्राप्त करणारे शेतकरीच खऱ्या अर्थाने शेतीतील संशोधक आहेत असे प्रतिपादन माजी महसूल व कृषी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी अध्यक्षीय भाषण करतांना केले.