
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगर परिसरात मागील महिन्यात ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत गंभीर जखमी झालेल्या चैतन्य गोविंद ताम्हणकर (वय ४०) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर महिनाभराच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे ताम्हणकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. चैतन्य ताम्हणकर हे आई-वडील आणि मोठ्या भावासोबत राहत होते. ही दुर्दैवी घटना मागील महिन्यात ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली होती. चैतन्य हे मित्रासह बुलेट दुचाकीवरून घरी परतत असताना गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली होती.
या भीषण धडकेत चैतन्य ताम्हणकर हे गंभीररित्या जखमी झाले होते, तर त्यांचे मित्र किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
या अपघाताप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तत्काळ ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आवश्यक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. चैतन्य यांच्या मृत्यूनंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया नशिराबाद पोलीस स्टेशनमार्फत पार पाडली जात आहे. एका तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



