कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील येथुन जवळच असलेल्या सोनबर्डी या गावात अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी गोजर मुहूर्तावर एका वानराने गावातील जयराम रामजी भिल यांच्या घरी देवापुढे प्राण सोडल्याची चमत्कारिक घटना घडली. त्याच दिवशी सकाळी गावाशेजारी असलेल्या एका शेतात एक वानर मादीही मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यावर एकत्रच अंत्यसंस्कार केले. तसेच दुसऱ्या दिवशी सण साजरा न करता दु:खवटा पाळला.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मृत्युच्या दोनदिवस आधी म्हणजे शनिवारी हे वानर अचानक जंगलातून गावात शिरले. त्याने पहिले दोन दिवस भाऊसाहेब पाटील, विक्रम पवार, नाना पाटील, सुकलाल मिस्त्री यांच्या घरांच्या आसपास दोन दिवस आपला मुक्काम ठेवला. बहुतेक मृत्यूची चाहूल लागलेल्या या वानराला कसला तरी शोध घ्यायचा होता. तिसऱ्या दिवशी त्याला हवे ते मिळाले असावे म्हणून त्याने जयराम रामजी भिल यांच्या घरात अचानक प्रवेश करून त्यांच्या घरात असलेल्या मंदिराजवळ जाऊन देवापुढे अखेर श्वास घेतला. मानवाप्रमाणेच इहलोकीची यात्रा संपवण्याआधी त्याला डोळेभरून देवाचे दर्शन घ्यायचे असावे.
साधारण त्याचवेळी गावालगत एका शेतात एक मादी वानरही गावकऱ्यांना मृतावस्थेत आढळून आली. दोघा वानरांच्या अशा आगळ्या मृत्युच्या घटनेमुळे गावकरी काहीवेळ हबकले, नंतर त्यांची देवभक्ती जागृत होवून त्यांना दु:ख झाले. दुसऱ्या सकाळी अक्षय तृतीया असूनही ग्रामस्थांनी एकदिलाने सण साजरा न करता संपूर्ण १० दिवस दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बँड लावून दोघा वानरांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा अस्थी विसर्जनासाठी संपूर्ण गाव एकत्र आले व गावात हनुमान मंदिराच्या समोर या वानरांची समाधी बनवण्याचा विचारही समस्त ग्रामस्थांनी केला आहे. तसेच दि. १५-०५-२०१९ रोजी (बुधवार) गावातील लोक मुंडन करणार आहेत तर दि. १६-०५-२०१९ रोजी (गुरुवार) त्याचा दशक्रिया विधी केला जाणार आहे. या दु:खद प्रसंगी संपूर्ण गावासह परिसरातील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.