जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली नाका परिसरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत शनिवार २ जुलै रोजी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील डीमार्ट समोरील शिरसोली नाका परिसरात १७ वर्षीय मुलगी ही आई, वडील आणि भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही मु.जे. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवार २ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कॉलेजला जावून येते असे सांगून घरातून गेली. सायंकाळपर्यंत अल्पवयीन मुलगी घरी न परतल्याने तिच्या आईवडीलांनी तिचा शोधाशोध करण्यास सुरूवात केली. त्यांचे नातेवाईक आणि मैत्रीणींकडे तपास करूनही कोणतीही माहिती मिळाली नाही. रात्री उशीरा अल्पवयीन मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.