जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना भादली ते भुसावळ रेल्वे दरम्यान घडली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भादली ते भुसावळ दरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर खांबा क्रमांक ४३३/१३ ते ४३३/१५ दरम्यान एक जण मयत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिस तेथे पोहचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद असलेल्या या तरुणाची कागदपत्रांवरून ओळख पटली. त्याचे नाव संतोष सिंग व तो झारखंडचा असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती दिली. या तरुणाच्या खिशात उधणा ते भुसावळपर्यंतचे रेल्वे तिकीट सापडले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहेत.