जळगाव (प्रतिनिधी) बायकोसोबत तिच्या माहेरी झालेल्या भांडणामुळे संतापाच्या भरात एकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कुसुंबा येथे आज सकाळी घडलीय.
याबाबत माहिती अशी की , नंदलाल शिवराज पाटील (वय 45, रा.मंदाने ता. पारोळा) हे नाशिकला राहतात. कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी माहेरी राहायला आली आहे. नंदलाल पाटील हे आपल्या पत्नीला घरी नेण्यासाठी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे आपल्या सासरी आले होते. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरी जाण्याच्या मुद्द्यावरून दोघं पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यामुळे संतापाच्या भरात नंदलाल पाटील यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून आता प्रकृती स्थिर आहे.