जळगाव (प्रतिनिधी) देशात सध्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव सुरु आहे. तो म्हणजे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. देशभर टप्प्या-टप्प्याने होत असलेल्या मतदान प्रक्रियेत आज तिसऱ्या टप्प्यात देश ११७ मतदार संघात मतदान होत आहे. त्यात आपल्या जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघांचाही समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा नवमतदार अर्थात प्रथम मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या निकालावर परिणामकारक ठरणारी आहे. जिल्ह्यातही या मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला.
टेक्नोसॅव्ही असलेली मतदारांची ही आधुनिक पिढी आपल्या नागरिक म्हणून असलेल्या या अधिकाराबाबत चांगलीच जागृत आणि उत्सुक असल्याचे दिसून आले. कॉलेजचा एखादा कार्यक्रम, एखादा फॅमिली प्रोग्राम, सहल किंवा धुळवडीसारखा सन साजरा करण्यात दिसत असलेला त्यांचा उत्साह आज मतदानातही दिसून आला. यंदा देशभरात एकूण सुमारे ९० कोटी नोंदणीकृत मतदार आहेत, त्यामध्ये सगळ्यात मोठा भाग हा प्रौढ मतदारांचा आहे, तर नव मतदार आणि ज्येष्ठ मतदार यांची संख्या जवळपास सारखीच आहे. ज्येष्ठ मतदार निवडणूक प्रक्रियेला सरावलेले आहेत. त्यांची मते चांगलीच ठाम झालेली असतात, पण नव मतदार मात्र या प्रक्रियेकडे कुतूहलाने आणि भविष्याची स्वप्ने डोळ्यांपुढे ठेऊन बघत आहेत, त्यामुळे त्यांचा कल यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदार संघात निर्णायक ठरण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे. हे नव मतदार नेमका कुणाला कौल देतात ? ते लवकरच स्पष्ट होणार आहे. देशात लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, एवढे मात्र नक्की !