बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील न्यायालय परिसरात ‘जागतिक आरोग्य दिन’ मोठ्या उत्साहात आणि प्रबोधनात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. तालुका विधी सेवा समिती आणि बोदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ‘सात्विक आहार’ाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन बोदवड न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश आतिश खोलम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन टी. पाटील, उपाध्यक्ष ॲड. धनराज प्रजापती आणि ॲड. के. एस. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित वकील, पक्षकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी बोलताना ॲड. अर्जुन पाटील यांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी ‘प्लेट वन’ आणि ‘प्लेट टू’ हे सोपे पण प्रभावी सूत्र मांडले. “जेवणाची सुरुवात नेहमी कच्च्या भाज्या, बीट, गाजर, काकडी आणि सलाडने करावी, त्यानंतरच मुख्य जेवण घ्यावे,” असे त्यांनी सांगितले. तसेच ‘रिजनल आणि सीजनल’ फळे आहारात समाविष्ट करण्याचे आवाहन करत सात्विक आहार हीच निरोगी आरोग्याची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मार्गदर्शनाने प्रभावित होऊन उपस्थित सर्वांनी पॅकबंद अन्न आणि फास्ट फूडचा त्याग करण्याची सामूहिक शपथ घेतली. न्यायालय परिसरात घेतलेली ही अनोखी शपथ चर्चेचा विषय ठरली असून, आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याचा हा उपक्रम ठळक ठरला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या थीमचा संदर्भ देताना ॲड. पाटील यांनी “माझे आरोग्य हा माझा अधिकार आहे” हा संदेश दिला. पैशांअभावी कोणालाही उपचारापासून वंचित राहावे लागणार नाही, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती त्यांनी दिली. आयुष्यमान भारत योजना आणि हेल्थ कार्डसारख्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात ॲड. धनराज प्रजापती यांनी ‘योग, व्यायाम आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲड. के. एस. इंगळे यांनी केले. ॲड. शारदा राऊत, ॲड. मीनल अग्रवाल यांच्यासह जिल्ह्यातील वकील वर्ग व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालय अधीक्षक वैभव तरटे आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमातून ‘फास्ट फूडला नकार, सात्विक आहाराचा स्वीकार’ हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. ‘प्लेट वन-टू’ या आहार पद्धतीची चर्चा रंगली, तर ‘रिजनल आणि सीजनल’ अन्नपदार्थांचे महत्त्व अधोरेखित झाले. आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याची जाणीव करून देत कार्यक्रमाने समाजात सकारात्मक संदेश पोहोचवला.



